भारत जोडो यात्रा की काँग्रेस जलाओ यात्रा !

#POST : भारत जोडो यात्रा कि कॉंग्रेस जलाओ यात्रा ?


'भारत जोडो यात्रा' या नावाने काँग्रेस ने एक पदयात्रा सुरु केलेली आहे. हा 'विचार' जरी चांगला असला तरी तो काँग्रेस च्या तोंडातून येणं हे मनाला, इतिहासाला आणि सामान्य जनतेला न पटणारं आहे. ह्याच गोष्टीची पुष्टी एक दो
न दिवसांपूर्वी झाली, जेव्हा काँग्रेस च्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल्स वरून संघाच्या गणवेशाला 'आग' लावलेला फोटो पोस्ट करण्यात आला.
खरंतर, या गोष्टीमुळे संघाला आणि संघ स्वयंसेवकांना काहीही फरक पडणार नाही, पण, काँग्रेस ची हि 'संघाबद्दल असलेली भित्री' बाजू सगळ्यांसमोर येणं गरजेचं आहे.
१९२५ साली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाल्यापासून, काँग्रेस हा संघाच्या विरोधात उभा राहिला आहे. खरंतर, परामपूजनीय आद्यसरसंघचालक डॉ.हेडगेवार हे देखील इतर स्वातंत्र्य सेनान्यांप्रमाणे काँग्रेस चे सदस्य होते आणि केवळ सदस्यच नाही तर काँग्रेस मधील एक बलशाली आवाज देखील होते.
पण, काँग्रेस चे होणारे वैचारीक पतन, भारतीयत्वापासून दूर जाण्याचे त्यांचे अनाहूत प्रयत्न, अल्पसंख्याक तुष्टीकरणामुळे बहुतांश लोकांच्या विरोधात आखली जाणारी धोरणे या सगळ्या गोष्टींमुळे डॉ.हेडगेवार, डॉ. मुंजे व इतर हिंदू नेत्यांनी काँग्रेस पासून स्वतःला दूर केले आणि कालांतराने 'एका स्वयंसेवी संस्थेचा जन्म झाला' ज्याचे नाव 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ'. संघाचे कार्य, अत्यंत झपाटीने वाढू लागले आणि या गोष्टीचा त्रास/भीती काँग्रेस च्या तत्कालीन नेत्यांना, आत्ताच्या नेत्यांप्रमाणे वाटू लागली. अनेक बदनामीचे कट रचले जाऊ लागले, पण या गोष्टीचा शष्प फरक संघावर, संघाच्या विचारांवर आणि संघाच्या स्वयंसेवकांवर पडला नाही. ते आपले 'भारतीयत्वाचे कार्य' अविरतपणे पार पाडत पुढे चालत होते.
संघावर सर्वात पहिली बंदी '१९४८' साली आली. हि बंदी केवळ 'गांधी हत्येत' संघ स्वयंसेवकांचा हात असू 'शकेल' या जोरावर होती. त्या वेळेला 'गोळवलकर गुरुजी' सरसंघचालक होते. त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी संघाच्या स्वयंसेवकांच्या विरोधात आणि संघाच्या विरोधात एक पुरावा मिळवून दाखवावा अशी खुली मागणी केली, पण सरकार ला काहीही सापडले नाही ! कालांतराने, जवळपास वर्षभराने संघावरची बंदी हटवण्यात आली आणि संघाचे कार्य अजून जास्त क्षमतेने आणि ताकदीने उभे राहिले. झोपलेल्या हिंदूंमधले हिंदुत्व जागृत करण्याचे कार्य या गोष्टींमुळे घडले. बंदी जरी काढली गेली असली, तरी संघाच्या बदनामीचे कट हे कमी झाले नव्हते या उलट ते वाढत चालले होते. संघाचे भारतीयत्व अर्थात हिंदुत्व काँग्रेस च्या 'अल्पसंख्याक तुष्टीकरणाच्या' राजकारणाला थेट आवाहन देणारे होते हे स्पष्टपणे दिसत होते. संघाच्या शाखा भारताच्या विविध कोपऱ्यात मोठ्या वेगाने पसरू लागल्या.
संघावर दुसरी बंदी लावण्यात आली ती इंदिरा गांधी यांच्या क्रूर आणीबाणी च्या वेळेला. असे असूनही, संघ स्वयंसेवक न थकता इमर्जन्सी च्या काळात देखील भारताच्या बाजूने लढत होते जेव्हा काँग्रेस (इंदिरा गांधी) स्वतःची गादी टिकवण्यात व्यस्त होती. इंदिरा गांधींच्या मृत्यू नंतर राजीव गांधींच्या काळात देखील संघाला कमी कष्ट सहन करावे लागले नाहीत. मीडियाला हाताशी धरून अनेक वेळेला संघावर, स्वयंसेवकांवर, त्यांच्या कार्यावर निशाणे साधले जात होते. पण, संघ थांबला नाही !
१९९२ मध्ये, बाबरी मशिदीच्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा बंदी घालण्यात आली. तेव्हा केंद्रात काँग्रेस चे सरकार होते. पुन्हा एकदा सरकारला संघाच्या विरोधात एकही पुरावा आढळला नाही ! काँग्रेस च्या अनेक सरकार येऊन गेले, अनेक पंतप्रधान होऊन गेले, 'राजमाता' आल्या, त्यांचे राजपुत्र आणि राजकन्या आले, त्यांना चिकटलेले भाड्याने विकत घेतलेले पत्रकार आणि लेखक आले, त्यांनी संघाची बदनामी करण्याची एक संधी सोडली नाही ! पण तरीही संघ थांबला नाही आणि कधीही थांबणार नाही.
काँग्रेस च्या बुद्धिहीन विदूषक राजकुमाराला आणि त्याच्या सोबत असलेल्या मुर्खांना लक्षात घेणं गरजेचं आहे कि कितीही प्रयत्न केले तरी संघाचे कार्य कधीही थांबू शकत नाही, कारण संघाचे काम हे 'भारतीयत्वाचे' कार्य आहे. याच कारणामुळे आज संघ जगातील सर्वात मोठी 'स्वयंसेवी' संघटना आहे, याच मुळे संघाचे स्वयंसेवक देश विदेशात संघाचा विचार म्हणजेच भारताचा विचार पसरवत आहेत आणि कदाचित 'काँग्रेस ने तोडलेल्या भारताला जोडण्याचे कार्य' इतर कोणतीही संघटना इतक्या कुशलतेने करू शकत नसेल !
काँग्रेस च्या राजकुमाराने स्वतःची जीभ आधी सांभाळावी, ज्याला लिटर आणि किलो मधला फरक कळत नाही, अश्याने स्वयंसेवकांचा गणवेश जाळण्याचा प्रयत्न करू नये.
त्रेता युगात एका रामसेवकाने, भक्ताने अर्थात भगवान हनुमानाने 'शेपटीला आग लावली' म्हणून सगळी लंका जाळली होती, कलीयुगात, त्याच हनुमानाचे आणि प्रभू श्रीरामाचे भक्त काँग्रेस नावाच्या 'वैचारिक रावणाची' लंका दहन करायला कदापिही कचरणार नाहीत !
श्री राम!
- मल्हार पांडे

Comments

Popular posts from this blog

गुढी पाडवा, हिंदू द्वेष आणि षड्यंत्र !