गुढी पाडवा, हिंदू द्वेष आणि षड्यंत्र !

  गुढी पाडवा, हिंदू द्वेष आणि षड्यंत्र ! 

      
आज गुढी पाडवा ! हिंदूंच्या नववर्षाची सुरुवात. भारताच्या विविध प्रांतांमध्ये हा सण जरी वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जात असला तरी सगळ्यांची कारणे मात्र सारखी आहेत. आपल्याकडे अर्थात महाराष्ट्रात ज्याला आपण गुढी पाडवा म्हणतो, त्याच सणाला कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यात उगादी किंवा युगादी असे म्हणतात. अनेकांनी हि गोष्ट आश्चर्याची वाटू शकते, पण आपण जशी बांबूवर साडी लावून, लिंबाचा पाला, गाठ्या लावून गुढी उभी करतो तश्याच पद्धतीने तिथेही केली जाते. याच दिवशी, काश्मीर, मध्ये काश्मिरी हिंदू नववर्ष म्हणून नवरेह साजरा करतात तर सिंधी हिंदू आजच्याच दिवशी छेती चंद या नावाने त्यांच्या नववर्षाचे स्वागत करतात व मोठ्या प्रमाणात सण साजरा करतात ! हि एवढी प्रस्तावना द्यायची गरज का पडली ? 

आपल्या महाराष्ट्राला जशी संस्कृतीच्या विशाल वृक्षाचा आशीर्वाद आहे त्याच पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्या वाळवळीचा देखील श्राप आहे. गेली काही वर्षे, हिंदूंचे सण आले कि त्यांच्या विषयी अपप्रचार करणे, त्या सणाच्या मागची कारणे तोडून मोडून जगाला सांगणे आणि कधीही अस्तित्वात नसलेल्या 'ब्राह्मण्यवादाच्या' नावे स्वतःचा हिंदू विरोधी अजेन्डा राबवणे हे सर्रास सुरु आहे. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगझेबाने अत्यंत क्रूरपणे मारले.


हिंदवी स्वराज्याची मोठी हानी झाली. पण, हे आपले दुर्दैव आहे कि आजच्या काळातील औरंगझेबाचें  वंशज, म्हणजेच ब्रिगेडी, स्वयंघोषित इतिहास प्राध्यापक व इतर मंडळी, औरंगझेबाच्या क्रूरतेविषयी, त्याच्या धर्मांधतेविषयी, संभाजी महाराजांना मारण्याच्या मागे असलेल्या कारणांवर प्रकाश न टाकता केवळ आणि केवळ हिंदूंविषयी असलेल्या द्वेषाच्या पोटी, संभाजी महाराजांच्या मृत्यूमागे ब्राम्हणांचा हात आहे आणि औरंगझेबाने ब्राम्हणांच्या सांगण्यावरून त्यांना मारून टाकले व याचा आनंद साजरा करण्यासाठी ब्राम्हणांनी गुढी उभी करायला सुरुवात केली असा अपप्रचार करत आहेत. या लोकांचे अज्ञान इथेच दिसते आणि वासरात लंगडी गाय शहाणी हि म्हण खरी ठरते कारण स्वतः औरंगझेबाच्या चरित्रकाराने अर्थात साकी मुस्तैद खान याने संभाजी महाराजांना औरंगझेबाने इस्लाम मध्ये 'काफिरांना' कशी शिक्षा दिली जाते त्याच प्रमाणे वागवून संभाजी महाराज व कवी कलश यांना मारून टाकले याचे तपशीलवार दाखले दिले आहेत.


ज्यांना या विषयी वाचायचे आहे त्यांनी मासिर-ए-अलामगिरी हे औरंगझेबाच्या अधिकृत चरित्र अवश्य वाचावे ! गुढी पाडवा हा सण किती पुरातन याचे अनेक दाखले आहेत. त्या पैकी एक आपल्याला ज्ञानेश्वरी मध्ये सापडतो. “अधर्माची अवघी तोडी | दोषांची लिहिली फाडी | सज्जनाकरवी गुढी | सुखाची उभवी |" त्याच प्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंगात देखील गुढी पाडव्याचा उल्लेख येतो. 


“ गोकुळीच्या सुखा । अंतपार नाही लेखा ॥१॥

बाळकृष्ण नंदा घरी । आनंदल्या नरनारी ॥धृ॥

गुढिया तोरणे । करिती कथा गाती गाणे ॥२॥

बाळकृष्ण नंदा घरी । आनंदल्या नरनारी ॥धृ॥

तुका म्हणे छंदे । येणे वेधिली गोविंदे ॥३॥" 


इथे एक लक्षात घेणे गरजेचे आहे कि संत तुकाराम महाराज हे शिवरायांचे समकालीन होते आणि त्यांचा मृत्यू १६५० च्या दरम्यान झाला आहे अर्थात संभाजी महाराजांच्या मृत्यूयाच्या आधी ३० एक वर्षे झाला आहे. वरील अभंग तुकाराम गाथेत उपलब्ध आहे आणि अभ्यास करण्याची इच्छा असणाऱ्यांनी तो अवश्य जाऊन वाचावा.


गुढी पाडव्याचे अनेक दाखले इतिहासाच्या विविध पानांमध्ये ठळकपणे उपलब्ध आहेत. दुर्दैव आहे कि हिंदू विरोधी लोकांना ती पाने वाचायची नाहीत किंवा ती साधने लोकांसमोर येऊ द्यायची नाहीयेत. छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव वापरून आजवर याच ब्रिगेडी आणि इतर मंडळींनी अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण केले आहे हे सर्वश्रुत आहे. संभाजी महाराजांचे धार्मिक कार्य ज्या लोकांना मान्य करायचे नाही, त्यांची हिंदू धर्मच्या विषयी असलेली आस्था, तो वाचवण्यासाठी त्यांचे असलेले प्रयत्न हे ज्यांना बघायचे नसतात, असे लोक त्यांच्या मृत्यूचे भांडवल करून हिंदू धर्माच्या विषयी तेढ निर्माण करतात यातच त्यांची कोती मानसिकता दिसते हे स्पष्ट आहे. अश्या लोकांनी तुम्हाला गुढी पाडव्याच्या दिवशी काही चित्र विचित्र मेसेज पाठवले तर त्यांना फक्त त्यांचे म्हणणे सिद्ध करण्यासाठी पुरावा मागा आणि मजा बघा ! त्यांना हेही सांगा कि छत्रपतींचे वंशज देखील मोठ्या जोमाने गुढी पाडवा साजरा करतात !!


मंडळी, आपल्यातल्या आपल्यात फूट पाडून आपली एकी भंग करण्यासाठी अनेक गट सरसावले आहेत, त्यासाठी ते गट हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहेत, हे प्रयत्न यशस्वी होऊ द्यायचे नसतील तर अश्या लोकांना वेळीच ओळखून त्यांचा बौद्धिक दृष्ट्या प्रतिकार करा, त्यांच्याकडे पुरावे मागा आणि पुरावे देऊ शकले नाहीत तर अश्या माणसांना वेळीच जागृत करा आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या सारखे हिंदुधर्माभिमानी बनवा ! हेच आपले कार्य ! 


सर्वांना गुढी पाडव्याच्या अनेक शुभेच्छा ! हे नवे वर्ष तुम्हाला समृद्धीचे, भरभराटीचे जावोच पण या नववर्षात वर्षी तुमच्याकडून हिंदू धर्मकार्य मोठ्या जोमाने घडो यासाठी आई जगदंबेच्या आणि प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना.




मल्हार हेरंब पांडे,

लोणी काळभोर

७७५७९९४४१६


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

भारत जोडो यात्रा की काँग्रेस जलाओ यात्रा !